आज औरंगाबादेत ….सूर्याभोवती दिसले तेजोवलय ( खळे )

आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहरातून दुपारी १:१५ पासून सुर्या भोवती तेजोवलय (खळे) दिसायला लागले . या वेळी नागरिकांना याची उत्सुकता वाटायला लागली..

आकाशात ढगांतील हिमकणांमुळे जी विविध प्रकारची तेजोवलये तयार झालेली दिसतात त्यामध्ये २२°चे खळे (Halo) हे एक सुंदर दृश्य आहे. ह्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती आकाशात अंदाजे २२° त्रिज्येचे वर्तुळाकार तेजस्वी कडे तयार झालेले दिसते. अशा कड्याला खळे म्हणतात. आकाशात तंतुमेघ ( Cirrus ) किंवा तंतुस्तरमेघ  (Cirrostratus Clouds) आले असता सूर्यप्रकाश जेंव्हा ह्या ढगातील सूक्ष्म पण लक्षावधी षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे वक्रीभवन होते आणि असे खळे दिसते.

 २२° खळे हे बरेच मोठे म्हणजे आपला हात आकाशात सूर्याच्या दिशेने  पूर्ण लांब केला असता पसरलेल्या तळहाताएवढी अंदाजे त्रिज्या असेल तेवढे दिसते. असे तेजोवलय (खळे) हे सर्वसाधारणपणे आकाशात बऱ्याच वेळा म्हणजे इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा दिसते

जेव्हा प्रकाशकिरण ६०° शिरोकोन असणाऱ्या षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे दोनदा वक्रीभवन होऊन ते २२° ते ५०° कोनातून वळतात. त्यांचा वळण्याचा कमीत कमी कोन हा अंदाजे २२° ( लाल तरंग लहरींसाठी अचूक २१.८४° तर नील तरंगांसाठी २२.३७°) असतो . प्रत्येक तरंगांसाठी हा कोन वेगळा असल्याने अशा खळ्यातील आतील कड लालसर तर बाहेरील कडा निळसर दिसते.

जनमानसात सूर्याभोवती पडणाऱ्या खळ्याबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत. येणाऱ्या वादळाची ती चाहूल असते ही त्यापैकीच एक.  इतर तेजोवलये किंवा खळ्याप्रमाणे २२° खळीसुद्धा आकाशात  तंतुमेघ किंवा तंतुस्तरमेघ आले असतानाच दिसतात आणि बऱ्याचदा एखादे मोठे वादळ येण्यापूर्वी काही दिवस काही वेळा ह्या ढगांचे आगमन होते. त्यामुळे ह्या समजुतीला असा तोडका मोडका काहीतरी आधार आहे असे म्हटले तरी चालेल. पण असे ढग काही वेळा वादळाची शक्यता नसतानाही येऊ शकतात. त्यामुळे हे खळे म्हणजे वादळाचे पूर्वचिन्ह असे खात्रीलायक म्हणता येत नाही. काही वेळा या मुळे पडणाऱ्या पावसात खंड पडतो ही देखील एक समजूत आहे.

श्रीनिवास एस औंधकर

संचालक

एम जी एम ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र

औरंगाबाद

मोबाईल : ९८५००८०५७७

One thought on “आज औरंगाबादेत ….सूर्याभोवती दिसले तेजोवलय ( खळे )

Leave a comment